Thursday, 30 January 2025

गांधींनी सामाजिक न्यायासाठी मनोभूमी तयार केली

*गांधींनी सामाजिक न्यायासाठी मनोभूमी तयार केली*
- चंद्रकांत झटाले, अकोला 
7769886666

महात्मा गांधींनी हा देश कसा घडवला? त्यासाठी नेमके काय केले? गांधींची तर जानेवारी १९४८ मध्येच हत्या झाली, संविधान लिहून पूर्ण झालं १९५० मध्ये. मग भारतीय संविधानाचा आणि गांधींचा संबंध काय? किंवा गांधींनंतर या देशात अनेक दशके झालेल्या राजकारणाचा आणि गांधींचा संबंध काय? गांधी हे तर सनातनी होते, त्यांचा आणि समतेचा संबंध काय? असे अनेक प्रश्न लोक आजही उपस्थित करीत असतात. ३० जानेवारी हा महात्मा गांधींचा स्मृतिदिन. त्यांचे स्मरण करतांनाच आपण त्यांच्याशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूयात.

      गांधी भारतात येण्याअगोदरपासून आधी सामाजिक स्वातंत्र्य की आधी राजकीय स्वातंत्र्य असा टोकाचा वाद आपल्या देशात सुरू होता. गांधींच्या अगोदरच्या काँग्रेसमध्ये तर सामाजिक सुधारणेचा विषयच ‘काँग्रेस’ नेत्यांना नको होता. या सामाजिक सुधारणेच्या विरोधाची तीव्रता इतकी होती की, काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा ‘विटाळ’ नको आणि तसे झाल्यास कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे व्यासपीठच पेटवून देऊ, इतकी प्रखर विरोधी भावना सामाजिक सुधारणांच्या बाबतीत खुद्द ‘काँग्रेस’ पक्षात होती. *इतक्या तीव्र विरोधानंतरसुद्धा* गांधींनी नागपूरच्या सन १९२० च्या ‘काँग्रेस’ अधिवेशनात ‘अस्पृश्यता निवारणा’चा ठराव स्वतः मांडला. त्यावेळी दलितांनी बौद्ध धर्मात प्रवेश घेतलेला नव्हता, ते सर्व हिंदूच होते आणि देशातील बहुतांश हिंदू समाज हा गांधीसोबतच होता. हिंदूंमधील स्पृश्य-अस्पृश्य हा भेद त्यांना मिटवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केले. पण त्यांच्या अशा प्रयत्नांची माहिती हेतुपुरस्सर लपवली जाते, किंवा तिचे अवमूल्यन केले जाते.

‘अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही तर ती सैतानाची करामत आहे. *सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे’,* असे गांधी धर्माधारित अस्पृश्यतेबद्दल म्हणत. ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि जर तसे असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको, मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करीत असल्याने, मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे.’ तसेच शूद्रांना वेद शिकण्याबाबत मनाई करणे मला स्वत:ला कधीच मान्य होणार नाही. ज्ञान म्हणजे कोण्या एका वर्गाची वा वर्णाची मिरासदारी वा हक्क नव्हे,’ *हे वाक्यही गांधींचेच आहे.* अस्पृश्यतेवर टीका करताना गांधी दि. २ ऑक्टोबर १९२१ च्या ‘यंग इंडिया’ मध्ये लिहितात की, ‘अस्पृश्यतेला सैतानाचा खेळ म्हणत असताना मला जराही संकोच वाटत नाही.’ श्री. के. एन. प्रभू व यु. आर. राव यांनी आपल्या ‘माईंड ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकात गांधींचे अस्पृश्यतेविरोधातील तीव्र शब्दातील वक्तव्य दिले आहे, *‘मला वाटते की अस्पृश्यता जिवंत राहिल्यापेक्षा हिंदू धर्मानेच मरून जावे.’* या वाक्यांवरून गांधींची अस्पृश्यतेविरोधातील भूमिका किती कठोर होती हे आपल्या लक्षात येईल.

गांधी म्हणायचे, ‘वेदांनी अस्पृश्यतेला मान्यता दिल्याचे जर कुणी सनातनी सिद्ध करेल तर मी वेद सोडून देईल; पण अस्पृश्यांना सोडणार नाही.’  गांधींना ‘अर्धनग्न फकीर’ म्हणणार्‍या विन्स्टन चर्चिलनेदेखील गांधींच्या हरिजन सेवेची प्रशंसा केली आहे.  

अस्पृश्यतेसंबंधी  ’द सर्च लाइट’, १६ ऑक्टोबर १९२५ मध्ये छापून आलेले गांधींचे विचार बघू या - ‘हिंदूंना मी अस्पृश्यतेसंबंधी काही सांगू इच्छितो. जर तुम्हाला खरी सेवा करावयाची असेल आणि हिंदू धर्म वाचवायचा असेल तर तुम्ही अस्पृश्यतेचे निवारण केलेच पाहिजे. तुम्ही जर अस्पृश्यतेपासून सुटका करून घेतली नाही तर हिंदुत्व तुमच्यापासून सुटका करून घेईल याची खात्री बाळगा. *ज्या धर्मात अगदी एका मनुष्याविरुद्धही द्वेष शिकविला जातो तो धर्म पवित्र असूच शकत नाही.’*

आफ्रिकेतून आल्यानंतर गांधींनी अहमदाबादमधील ‘कोचरब’ येथे आश्रम सुरू केला असताना त्यांना ठक्करबाप्पांचे पत्र आले की, ‘एका अस्पृश्य परिवाराला आश्रमात पाठवू इच्छितो. त्यांना आपल्या आश्रमात प्रवेश द्याल काय?’ आश्रमात अस्पृश्यांना प्रवेशबंदी नव्हतीच त्यामुळे ‘आश्रमशिस्त पाळण्याच्या अटीवर त्यांना पाठवा’, असे गांधींनी ठक्करबाप्पांना कळवले. ते अस्पृश्य कुटुंब जेव्हा आश्रमात राहायला आले तेव्हा आश्रमाचा खर्च भागवण्यासाठी मदत करणारे श्रेष्ठी आणि आश्रमवासीय गोंधळून गेले. मदत करणार्‍या श्रेष्ठींनी मदत थांबवली. पंचाईत झाल्यामुळे मगनलाल (गांधीजींचे सुपुत्र) एके सकाळी गांधींकडे आले आणि भाजीसाठी पैसे नाहीत असे म्हणाले. ‘भाजीशिवाय चालवू; परंतु अस्पृश्य परिवाराला आश्रमातून परत पाठवणार नाही’, या भूमिकेवर गांधीजी ठाम राहिले. कस्तुरबांनी जरी आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला तरी मगनलाल गांधी आणि त्यांच्या परिवाराचे मतपरिवर्तन झाले नाही. ते आश्रम सोडून गेले. पुढे आपली चूक लक्षात आल्याने आश्रमात परत आले. गांधीजींच्या बहीण आणि त्यांचे कुटुंबीय आश्रम सोडून गेले. कस्तुरबांच्या मनात देखील द्वंद्व निर्माण झाले होते, तेव्हा गांधीजी म्हणाले, ‘त्यांना वाटले तर त्या देखील आश्रम सोडून जाऊ शकतात, परंतु मी या (अस्पृश्य) कुटुंबाचा त्याग करणार नाही’. गांधींनी एका अस्पृश्य जोडप्याकरिता आपला परिवार व आपली पत्नी, आपल्या आश्रमाला रसद पुरवणारे श्रेष्ठी यांची सुद्धा पर्वा केली नाही. त्यांच्या याच वागण्यातून त्यांचे अनुयायी घडत गेले. समाजात अस्पृश्यतेविरोधातला एक प्रकारचा संदेश गांधीजींच्या अशा दृढनिश्चयातून जात राहिला आणि *अस्पृश्यांचे मानवी हक्क मान्य करण्यासाठी समाजाची एक मनोभूमी यातून तयार होत गेली.*  

‘पुणे करारा’च्यावेळी गांधींनी दलितांना विभक्त मतदारसंघ देऊ नये तर संयुक्त राखीव मतदारसंघ त्यापेक्षा अगदी दुप्पट संख्येने द्यावेत अशी भूमिका घेतली. कारण ‘विभक्त मतदारसंघामुळे स्पृश्य व अस्पृश्यांमध्ये कायमची दुफळी निर्माण होईल. माझ्या हरिजन बांधवांच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. इंग्रजांच्या जातीय निवाड्यामुळे अस्पृश्यतेचा कलंक आणखी गडद होईल. अस्पृश्य बांधवांवर अनन्वित अन्याय-अत्याचार करून आम्ही स्पृश्यांनी पापाच्या राशी रचल्या आहेत. या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी व अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी मला प्राणत्याग करावा लागला तरी त्याची पर्वा नाही,’ असे मत उपोषणावेळी गांधींनी पत्रकारांजवळ व्यक्त केले. या विभक्त मतदारसंघाला विरोध करताना गांधी म्हणाले, ‘भारतीय समाजव्यवस्थेची जाणीव नसणाऱ्यांनी तिचे हे विभक्तीकरण चालविले आहे. दलितांना विभक्त मतदारसंघ दिले तर गाव व खेडे जातीत विभागले जाईल आणि त्यातून सारा समाज विस्कळीत, दुबळा व कुजका होईल.’  दलितांवरील अत्याचारांबद्दल प्रचंड चीड मनात असलेले गांधी म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिकेत असताना सामाजिक अन्याय कसा असतो, ते मी दलितांसारखेच अनुभवले आहे. मात्र त्यांना वेगळे करणे हा त्यावरचा उपाय नाही.’ याच उपोषणाच्या पाचव्या दिवशी जेव्हा गांधींची प्रकृती अतिशय खालावली त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले. तेव्हा चर्चेत गांधी म्हणाले, ‘तुम्ही जन्माने दलित आहात, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून दलितांसाठी लढायला मी तयार आहे. *अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहणे मला पसंत नाही, म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे.* प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही. विभक्त मतदारसंघामुळे स्पृश्य आणि अस्पृश्य हिंदूंमधील अंतर वाढेल.’ ह्या दोघांनीही खांद्याला खांदा लावून सामाजिक व राजकीय समस्या सोडविण्यासाठी लढावे ही गांधींची इच्छा होती. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल जी मागणी ‘पुणे करारा’च्या वेळी बाबासाहेबांनी केली ती विभक्त (स्वतंत्र) मतदार संघाची मागणी बाबासाहेबांनी मसुदा समितीचे अध्यक्ष असतानासुद्धा संविधान सभेत केली नाही. 

दि. ३० सप्टेंबर १९३२ रोजी मुंबई येथे ‘अस्पृश्य समाज सेवक संघ’ (हरिजन सेवक संघ) याची गांधीजींनी स्थापना केली. ज्याच्या बारा सदस्यांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर श्रीनिवासन हे देखील संस्थापक सदस्य होते. संघटनेचे कार्य तातडीने सुरू व्हावे यासाठी सन १९३२ मध्येच ‘हरिजन सेवक संघा’ची हंगामी घटना तयार केली गेली. (खैरमोडे डॉ. भी. रा. आं. चरित्र खंड-५, पृष्ठ ७३) ‘हरिजन सेवक संघ’ स्थापन करून गांधी कायम हरिजन फंड गोळा करून त्याचा अस्पृश्यता निवारणासाठी विनियोग करीत होते. गांधी ‘हरिजन सेवक’ बनले होते.

उपोषणाच्या ५ दिवस अगोदर म्हणजेच दि. १५ सप्टेंबर १९३२ मध्ये काढलेल्या एका पत्रकात गांधी म्हणतात, ‘हिंदूंमधील सवर्णांचे नेते आणि अस्पृश्यांमधील दलितांचे पुढारी यांच्यात जाती निर्मूलनाबद्दल एकमत होण्यात फारसा अर्थ नाही. *जोपर्यंत समस्त हिंदू समाज अस्पृश्यता निवारणाची प्रतिज्ञा करीत नाही आणि त्यासाठी सज्ज होत नाही, तोवर आतापर्यंतचे सारे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत.’* गांधींच्या या आवाहनाने आणि उपोषणामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात अस्पृश्यता निवारणाचा संदेश गेला. कलकत्त्याचे काली मंदिर, बनारसचे राम मंदिर त्यानंतर पहिल्याच आठवड्यात अस्पृश्यांसाठी खुले झाले. बडोदा, काश्मीर, भोर आणि कोल्हापूर येथील मंदिरांसह शेकडो मंदिरांचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले झाले. पाणवठे खुले झाले. हरिजनांमध्ये जागृती झाली. आधी दलिताने रस्त्याने चालायचे म्हणजे गळ्यात गुरासारखी घंटा किंवा ढोल बांधून ‘दूर व्हा मायबाप’ असे म्हणत चालावे लागायचे; पण या उपोषणानंतर दिल्लीतील रस्त्यांवर दलित-सवर्णांचे बंधुत्व दाखवणार्‍या एकत्रित मिरवणुका निघाल्या. मुंबईत महिलांच्या संघटनांनी दलितांच्या मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर जनतेचे मतदान घेतले. त्यात २४ हजार ७९७ मते अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या बाजूने तर फक्त ४४५ मते प्रवेश देण्याच्या विरोधात पडली. गांधीजींच्या अशा प्रयत्नांमुळेच अस्पृश्यतेचा विचार बोथट झाला, हे स्पष्ट होते. *ही या हजारो वर्षांच्या भारतीय इतिहासातील अद्वितीय घटना होती.* 

पंडित नेहरूंच्या मातोश्री स्वरूपराणी ह्या अगदी कर्मठ सनातनी ब्राम्हण; पण त्यांनी हरिजनांना आमंत्रित करून आपल्या हाताने भोजन भरवले. ‘काँग्रेस’चे जमनालाल बजाज यांनी वर्ध्यातील स्वतःच्या लक्ष्मीनारायण मंदिरात हरिजनांना प्रवेश दिला. ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तील धृव या कर्मठ कुलगुरूंनी हजारो दलितांसोबत सहभोजनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या परिसरात आयोजित केला. आज जरी आपल्याला ह्या सर्व गोष्टी सामान्य वाटत असल्या तरी त्यावेळी भारतीयांच्या मानसिकतेत इतक्या सुधारणा होणे ही सामान्य गोष्ट नव्हती. हा क्रांतिकारी बदल होता. हे उपोषण न करता जर गांधींनी ‘गोलमेज परिषदे’तच बाबासाहेबांना जास्त जागा देण्याचे मान्य केले असते तर देशभरात हा संदेश गेला नसता आणि अस्पृश्यताविरोधी इतकी जनजागृती झाली नसती. *एका उपोषणाने संपूर्ण देशात घडून आलेले हे असामान्य परिवर्तन पाहता आले नसते. स्पृश्य हिंदूंमध्ये दलितांविषयीच्या खोलवर रुजलेल्या तिरस्काराचे गांधींना निर्मूलन करायचे होते. ‘दलित’ व ‘अस्पृश्य’ हा शब्ददेखील त्यांना बदलायचा होता. एका दलित बांधवानेच त्यांना ‘हरिजन’ हा शब्द सुचवला.* तो गांधींनी स्वीकारला आणि देशभरात अस्पृश्यांकरिता ‘हरिजन’ हा शब्द रूढ झाला. इतकेच नाही तर गांधींची ईश्वराला प्रार्थना असायची की, ‘मला पुनर्जन्म नको; पण मिळालाच तर दलिताचा मिळावा.’ यावरून आपल्याला काय दिसून येते? गांधींच्या या उपोषणाच्या एक दिवस आधी मुंबईत झालेल्या सनातनी हिंदूंच्या सभेत एक ऐतिहासिक ठराव झाला, ‘स्वराज्याच्या संसदेतील सर्वात पहिला कायदा हा अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक शाळा, रस्ते आणि इतर सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये जाण्या-येण्याचा, प्रवेशाचा समान अधिकार देणारा असेल.’ गांधींच्या उपोषणाच्या दबावाखालीच का होईना; पण सामाजिक समानतेसाठी समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात झाली. सवर्णांच्या मनातून अस्पृश्यता काढण्याच्या गांधीजींच्या प्रयत्नांना मोठे यश येत गेले. 

गांधींनी दि. २० सप्टेंबर १९३२ ला केलेल्या या उपोषणावेळी देशातील कोट्यवधी लोकांनी उपवास केला. संपूर्ण देशातून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर म्हणाले, ‘प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र भूगोल असतो त्यात आस्तिक्याचा वास असतो, त्यावर भौतिक सत्ता चालत नाही; मात्र थोरांचे माहात्म्य त्यावर राज्य करीत असते. गांधींनी सुरू केलेले उपोषण हा तसाच संदेश आहे. कोणताही सुसंस्कृत देश अस्पृश्यतेसारखे मालिन्य वाहून नेत नाही. तो माणुसकीचा अपमान आहे.’ हा पुणे करारादरम्यान गांधीजींनी केलेल्या उपोषणाचा आणि ठरावाचा परिणाम होता.

  येरवडा जेलमध्ये गांधींसोबत असलेले सरदार पटेल गांधींना म्हणाले होते की, ‘दोन्ही बाजूंना भांडू द्या, परंपरावादी आणि आंबेडकरांचे अनुयायी यांच्यात (गांधींनी) मध्ये पडू नये.’ यावर गांधीजी म्हणाले, *‘लक्षावधी दलितांना असे वाटता कामा नये की, आपण त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.’* याच येरवडा जेलमध्ये एकदा पंडित नेहरू गांधीजींना भेटायला गेले असता हरिजनांसाठी काम करण्याचा व हरिजन यात्रा काढण्याचा मनोदय गांधींनी त्यांच्यापाशी बोलून दाखवला. त्यावर नेहरूंनी असे मत व्यक्त केले की, ‘अस्पृश्यता निवारणाचे काम चांगले असले तरी, ते आताच न करता स्वराज्य मिळाल्यावर करावे. अस्पृश्यता निवारणापेक्षा स्वराज्यासाठी प्रथम काम करण्याची गरज आहे. मध्येच हरिजनांसाठी काम सुरू केल्याने स्वातंत्र्य आंदोलनाकडे लक्ष कमी होण्याची शक्यता आहे.’ अस्पृश्यता निवारणासंदर्भाने ‘काँग्रेस’मधील समाजवादी नेत्यांशीही गांधींचे मतभेद झाले; पण गांधीजी मागे हटले नाहीत. येरवडा तुरुंगातून सुटल्यावर गांधींनी साडेबारा हजार मैलांची मोठी हरिजन यात्रा काढली. यावेळी उच्चवर्णीयांमध्ये भयंकर खळबळ माजली व संतापाची लाट उसळली. ही हरिजन यात्रा रोखण्याचेही प्रयत्न झाले. इतकेच नाही तर याच हरिजन यात्रेदरम्यान पुण्यात गांधींवर बॉम्बहल्ला झाला; पण त्यातून ते थोडक्यात बचावले. *यावरून अस्पृश्यता निवारण करणाऱ्या गांधींना किती भयंकर विरोध झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.*

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारता’त छपलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, ‘आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरातून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंतःकरणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत. ही अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर, हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही,’ असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. *यावरून काय गांधी सनातनी वाटतात?*

सन १९३२ मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात आप्पासाहेब पटवर्धनांनी तुरुंगातील भंग्याचे काम त्यांना करू द्यावे अशी मागणी केल्यानंतर त्यांना तुरुंग प्रशासनाकडून नकार देण्यात आला आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी आप्पासाहेबांनी प्राणांतिक उपोषण करण्यास सुरुवात केली. यावेळी गांधींनी आपल्या या शिष्याच्या नैतिक मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी दोन दिवसांचे उपोषण केले. आप्पासाहेब पटवर्धन स्वतःसाठी अधिक कठीण कामाचीच मागणी करत नव्हते, तर अस्पृश्यतेच्या विरोधात एक उदाहरणही घालून देण्याचा प्रयत्न करीत होते. सन १९३४ मध्ये गांधींनी स्वतःसुद्धा आप्पासाहेबांचे अनुकरण केले आणि स्वतःसाठी अशाच कामाची मागणी केली; आणि ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी आठवडाभर उपोषण केले होते.

गांधींनी आपल्या जीवनात अस्पृश्यता निर्मूलनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होते. त्यात त्यांनी जाहीर केले की, ‘आपल्या आश्रमात यापुढे फक्त विजातीय विवाहच होतील.’ म्हणजे ज्या लग्नात वर किंवा वधू यांपैकी एक अस्पृश्य (दलित) व एक स्पृश्य (सवर्ण) असेल असेच विवाह आश्रमात होतील आणि अशाच विवाहांना मी हजर राहीन. इतकेच नाही तर त्यांनी कोणत्याही सजातीय विवाहाला आपण यापुढे हजर राहणार नाहीत, म्हणजे ज्या लग्नात दोन्ही हरिजन किंवा दोन्ही स्पृश्य-सवर्ण असतील त्या लग्नाला मी जाणार नाही, असेही ठामपणे सांगून टाकले. असे फक्त त्यांनी जाहीरच केले नाही तर वर्तनातूनसुद्धा दाखवून दिले. *स्वतःचे सचिव महादेवभाई देसाई यांच्या मुलाच्या, नारायणभाईंच्या, सजातीय विवाहाला देखील ते गेले नाहीत.* 

गांधीजी आस्तिक होते, ईश्वरावर त्यांची गाढ श्रद्धा; पण ह्या ईश्वराचे दर्शन घ्यायला ते कधीच मंदिरात गेले नाहीत. त्यांच्या आश्रमात देवघर नाही की, आश्रमाच्या आवारात मंदिर नाही. कारण गांधींचा ईश्वर वेगळा होता. कोणता ईश्वर? ईश्वर सत्य आहे, या वचनाचा व्यत्यास त्यांनी ‘सत्य हाच ईश्वर’ असा मांडला. *धर्माच्या नावावर केले जाणारे शोषण, देवाधर्माच्या नावावरचे कर्मकांड, वाईट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता, उच्च-नीच भेदभाव दूर करण्यासाठी धर्माचा आधार सोडून चालणार नाही, असे गांधींचे मत होते.* जसे तुकारामांनी धर्मावर, त्याच्या नावाने चालणार्‍या ढोंगबाजीवर कितीही कठोर प्रहार केले असतील; पण त्यांनी कधी ‘विठ्ठल’ सोडला नाही. ‘तुमच्या देवावर काय कुत्रेही टांग करून मुतते,’ इतकी कठोर भाषा गाडगेबाबांनी वापरली असेल; पण त्यांनी कधी ‘गोपाला’ सोडला नाही. तसेच गांधींनी वाईट परंपरा तोडण्याकरिता, अस्पृश्यता निवारणाकरिता, लोकांना जोडण्याकरिता, माणुसकीच्या प्रचार-प्रसाराकरिता धर्माचा आधार मात्र घट्टपणे धरून ठेवला.
      
गांधींनी कर्मसंकर घडवला. म्हणजे गांधींनी जो चातुर्वर्ण्य सुरुवातीला मानला होता तो सुद्धा कर्मावर आधारित होता, जाती-धर्मावर नाही. भंगीकाम, मेलेल्या ढोरांची कातडी सोलणे ही कामे शूद्रांची; पण गांधींनी ही कामे सवर्णांनाही करायला लावली. ही सगळी कामे गांधींच्या सांगण्यावरून ब्राह्मणांनीही केली. अस्पृश्यता निवारणाच्या किंवा श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली असो, गांधींनी असली हलक्या दर्जाची समजली जाणारी कामे, *हलक्या जातींनी करावयाची कामे वरच्या जातींच्या लोकांनी करायला सवर्णांची मनोभूमी तयार केली आणि ते सुद्धा आजपासून ९०-१०० वर्षांपूर्वी.* त्यासाठी त्यांनी अनेक सवर्णांना प्रेरणा दिली. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोकणातील आप्पासाहेब पटवर्धन हे शुद्ध चित्तपावन ब्राह्मण. त्यांनी आयुष्यभर गांधींच्या सांगण्यावरून भंगीकाम व चांभारकाम केले. आप्पासाहेब पटवर्धनांसारखी असंख्य उदाहरणे आहेत की, जिथे गांधींच्या सांगण्यावरून समाजात ‘कर्मसंकर’ घडून येत होता.
    
या वरील सर्व घटना बघता आपल्या लक्षात येईल की गांधींनी या देशातील मातीत समतेची बीजे पेरण्याची सुरुवात अनेक वर्षांआधीच केली होती. गांधींच्या या अशा शिकवणीतून त्यांच्यासोबत असलेले स्वातंत्र्यलढ्यातील सर्व सेनानी आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते घडत होते. *या सर्वांच्या मनात गांधींनी आपल्या आचरणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेची बीजे रोवली होती.* गांधींच्या तालमीत तयार झालेल्या सर्वच नेत्यांवर नैतिकतेचे असे संस्कार झाले होते. त्यांच्या माध्यमातून सामान्य सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिकांमध्ये हे संस्कार झिरपले होते. त्यातून एक सामाजिक संस्कृती निर्माण झाली होती. समाज घडविण्याची ही गांधीजींची दूरदृष्टी होती. आपल्या तत्त्वांसाठी आणि सत्यासाठी कुणाशीही संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. धर्मनिरपेक्षता त्यांच्या अंगी बाणविण्यात गांधी यशस्वी झाले होते. याच सर्व गोष्टींचा फायदा संविधान सभेत संविधान पारित करताना झाला. कसा झाला तो बघूयात.

घटना परिषदेवर सन १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा बंगालच्या ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो जैसोर-खुलना मतदारसंघ भारताच्या फाळणीमुळे पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व संपुष्टात आले होते. *बाबासाहेबांचा मतदारसंघ ‘काँग्रेस’च्या नेत्यांनी मुद्दामच पाकिस्तानात घातला असा धादांत खोटा आरोप काही लोक करतात.* फाळणी करणारे इंग्रज अधिकारी रेडक्लीफ यांनी त्यांच्या मनाप्रमाणे देशाचे दोन तुकडे केले. त्यात गांधीजी किंवा ‘काँग्रेस’ला हस्तक्षेपाचा अधिकारच नव्हता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजी आणि ‘काँग्रेस’ने हा जैसोर-खुलना मतदारसंघ मुद्दामच पाकिस्तानात घातला असता तर हा मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यानंतर स्वतःच्या (कॉंग्रेसच्या) कोट्यातून बाबासाहेबांना घटनासमितीवर पुन्हा बिनविरोध कशाला निवडून आणले असते? हा तरी विचार असा आरोप करणाऱ्यांनी आणि त्या आरोपाला बळी पडणाऱ्यांनी करावा. गांधींना बाबासाहेब घटना समितीवर पाहिजे होते कारण बाबासाहेबांची विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता दोन्हींवर त्यांचा विश्वास होता. परंतु त्यासाठी बाबासाहेब कुठल्यातरी मतदारसंघातून निवडून येणे आवश्यक होते. त्याकरिता गांधींनी नेहरूंना सूचना केल्या. त्यानुसार बॉम्बे मतदारसंघातून बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ‘काँग्रेस’च्या जागेवर *‘काँग्रेस’ने बाबासाहेबांना घटना परिषदेवर स्वत:च्या कोट्यातून पुन्हा बिनविरोध निवडून आणले.* बाबासाहेबांना ऑगस्ट १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री पद दिले गेले. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट अनेकदा लपविली जाते. ही निवड करताना ‘काँग्रेस’चे बहुमत होते. त्यांच्यावर कुठलेही बंधन नव्हते ही गोष्ट गांधीजींच्या विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे. पंडित नेहरूंनी ज्यावेळी पहिले राष्ट्रीय मंत्रीमंडळ बनवले आणि त्यातील मंत्र्यांची यादी गांधींना दाखवली, ती यादी बघून गांधींनी नेहरूंना विचारले, “ही यादी देशाच्या मंत्रीमंडळाची आहे की, केवळ काँग्रेसच्या मंत्रीमंडळाची?”
या प्रश्नाचा अर्थ पंडित नेहरूंना कळेना, तेव्हा त्यांनी गोंधळून विचारले, ‘यात काय चुकले?’
त्यावर गांधीजी म्हणाले, “या यादीत बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का नाही?”
गांधींच्या या प्रश्नावर नेहरूंनी आश्चर्याच्या सुरात म्हटले, ‘डॉ. आंबेडकर तर काँग्रेसचे विरोधक आहेत. त्यांचा मंत्रीमंडळात समावेश कसा करता येईल?’
यावर गांधींनी नेहरूंना पुन्हा तोच प्रश्न विचारला, “तुम्हाला काँग्रेसचे मंत्रीमंडळ बनवायचे आहे की राष्ट्राचे?” नेहरू यावर निरुत्तर झाले आणि बाबासाहेबांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आणि बाबासाहेब भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले हे लक्षात घेतले पाहिजे.
*बाबासाहेबांनी केलेला विरोध, मतभेद गांधींनी कधीच देशहिताच्या किंवा वैयक्तिक संबंधाच्या आड येऊ दिला नाही. हेच त्यांचे माहात्म्य.* बाबासाहेबांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहून ठेवले आहे की, ‘जवाहरलाल नेहरूंनी मला सचिवालयात बोलावून, स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात विधीमंत्रिपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय, अशी पृच्छा केली. याला मी होकार दिला; *कारण मला मंत्रीमंडळात घेण्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नव्हती.’ हे स्वतः बाबासाहेब सांगतात. यावरून काय सिद्ध होते?*

दुसरा एक प्रसंग याठिकाणी गांधीजी, नेहरू आणि सरोजिनी नायडू हे तिघे दिल्लीत होते त्यावेळचा आहे. यांच्यात भारताची घटना तयार करण्याविषयीची चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान नेहरू म्हणाले, ‘घटना तयार करण्याबाबत सल्ला देणार्‍या तज्ज्ञांची आपल्याला गरज आहे. इंग्लंड किंवा अमेरिकेतून एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराला आपण करारावर भारतात आणू या.’
त्यावर गांधीजी म्हणाले, ‘का? आपल्या देशात असा तज्ज्ञ सल्लागार नाही?’ त्यावर नेहरूंनी, ‘कोण आहे?’ असा प्रतिप्रश्न केला. *गांधीजी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांइतका संविधान समजणारा दुसरा कुणी नाही.’*

पुढे गांधींच्या सूचनेवरून डॉ. आंबेडकरांचा घटना समितीत समावेश झाला. आता बाबासाहेबांनी संविधानातील एकेक तरतूद संविधान सभेसमोर मांडली. एकेका तरतुदींवर अनेक तास तर काहींवर अनेक दिवस चर्चा चालली. संविधान सभेत म्हणा किंवा संसदेत म्हणा त्यावेळी बहुमत होते काँग्रेसचे. काँग्रेस म्हणजे नेहरू, गांधी, पटेल आणि आझाद. यांना जर ह्या तरतुदी मान्य नसत्या तर त्या कदापि संविधानात समाविष्ट झाल्या नसत्या. पण काँग्रेस सदस्यांना त्या तरतुदी मान्य झाल्या. *कारण गांधी या देशात आल्यापासून या देशातील लोकांच्या मनात ते समतेची रुजवणूक करत होते. एक सामाजिक संस्कार करीत होते; एक समताधिष्ठित संस्कृती निर्माण करीत होते. बहुतांश काँग्रेस सदस्य हे गांधींचे अनुयायी होते. या देशात समानता असावी, बंधुत्व असावं, सर्वांना सत्तेत समान वाटा मिळावा, एक नैतिकता पाळत राजकारण व्हावं हा विचार गांधींनी या देशातील नागरिकांमध्ये आणि आपल्या राजकीय अनुयायांमध्ये पेरला होता.* त्यामुळे आज संविधानात आपल्याला दिसत असलेल्या समतेच्या, बंधुत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदी मान्य होऊ शकल्या. वंचित घटकांचे न्याय्य हक्क मान्य करण्याची सामाजिक संस्कृती गांधींनीच निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यासाठी संविधान सभेतील सदस्यांना समजावून सांगावे लागले, पण त्या सदस्यांनी समजून घेण्यामागे गांधींची शिकवण होती हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल.

गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये जर शत्रुत्व असते तर गांधींकडे आणि ‘काँग्रेस’कडे बहुमत असताना त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणून मंत्रीमंडळात सामावून घेतले नसते आणि बाबासाहेबांनीसुद्धा नेहरूंचा कायदेमंत्री पदाचा प्रस्ताव स्वीकार केला नसता. घटनासभेत ‘काँग्रेस’चे ८२ टक्क्यांपेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मूलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर ‘धम्मचक्र’ यांसारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. *‘काँग्रेस’चे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या.* ‘काँग्रेस’ आणि बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. आणि त्यामुळेच असे मजबूत, द्रष्टे, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संविधान भारताला मिळाले. हा विचारसुद्धा या निमित्ताने करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष एकमेकांमुळे आणखी मोठे झाले.

विशेष म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात आपल्या विरोधी विचारांचे आणि विरोधी पक्षाचे ७ लोक (त्यात हिंदू महासभा आणि कम्युनिस्ट देखील होते) गांधींच्या सल्ल्याने नेहरूंनी घेतले होते. कारण त्यांना देशाचे मंत्रीमंडळ, पक्षाचे नव्हे, बनवायचा शहाणपणाचा सल्ला गांधीजींनी दिला होता. या मंत्रीमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जींसह आणखी ५ लोक इतर पक्षांचे होते. गांधींनी विरोधी विचारांचासुद्धा कायम सन्मानच केला. *गांधीनी विरोधकांवर देशद्रोही म्हणून त्याचवेळी शिक्कामोर्तब केले असते तर ते नामशेष झाले असते. आज ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नसते.* आज विरोधी पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळात घेतील असा विचार तरी आपण करू शकतो का? 
     
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेम्बर १९४९ रोजी संविधान सभेत संविधान देशाला सुपूर्त करताना जे भाषण केले त्यात ते म्हणतात, “हे संविधान प्रामाणिकपणे राबविणारी माणसे देशाच्या शासनात यावीत, जर अप्रामाणिक माणसे शासनात आली तर संविधानाची अंमलबजावणी योग्यरीत्या करणार नाहीत, तो दोष त्या संविधानाचा नसेल तर अप्रामाणिक राज्यकर्त्यांचा असेल.” स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काही दशकात हा देश ठामपणे स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि जगातील इतर देशांच्या बरोबरीने चालायला लागला ते तत्कालीन सरकारातील नैतिकता पाळणाऱ्या शासनकर्त्यांमुळेच. *ती नैतिकता गांधींच्या शिकवणीतून तत्कालीन नेत्यांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये झिरपलेली होती.* गांधींचे स्पष्ट म्हणणे होते की फक्त साध्य पवित्र असून चालणार नाही तर ते मिळविण्यासाठी साधन सुद्धा तितकेच पवित्र असले पाहिजे. म्हणजे मार्गही पवित्र आणि सत्याचाच असला पाहिजे.
     
गांधींनी कायम हा समाज आणि या समाजातील माणूस आदर्शवत घडावा यासाठी प्रयत्न केले. सामाजिक सुधारणा समाजासाठी किती महत्वाच्या आहेत हे रुजवले. चांगल्या स्वभावाची, नैतिकता स्थायीभाव असलेली माणसे गोळा करून सत्याच्या व अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच माणसांनी स्वातंत्र्यानंतर एक पिढी राज्यकारभार चालवला. पण आज चित्र पूर्णपणे पालटले आहे. *फक्त राजकारण्यांचेच नाही तर देशातील नागरिकांच्या स्वभावातूनसुद्धा नैतिकता नावाचा विषय नियोजनपूर्वक पूर्णपणे खरडून टाकलेला आपण बघतो आहोत.* आधी कुणी नेता चुकीचे वागल्यास त्याला नागरिकांकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे लागे. तो समाजात मान वर करून चालू शकत नसे. सामाजिक आणि राजकीय जीवनातून अशी माणसे हद्दपार होत असत. पण आज चित्र बदलले आहे. आज नेत्यांच्या अशा भ्रष्ट वागण्याला समाजमान्यता मिळत असल्याचे चित्र आहे. एखाद्यावर भ्रष्टाचार, खून, बलात्कारासारखे गुन्हे दाखल झाल्यावरसुद्धा अशांच्या समर्थानात लोक उभे झालेले आपण बघतो आहोत. विशेष म्हणजे असे चुकीचे लोक आज समाजाचे आदर्श होऊ पाहत आहेत हे अत्यंत संतापजक आहे. गांधींनी प्रचंड कष्ट घेत हा भारत, भारतीय समाज जसा घडवला होता त्या भारताचा चेहरा-मोहराचं आता पार बदलून गेलेला आहे. पुन्हा आपला देश जागेवर आणण्यासाठी दोनच उपाय आहेत. एक म्हणजे महात्मा गांधींसारखे व्यक्तिमत्व पुन्हा जन्मण्याची वाट बघणे किंवा गांधी विचाराच्या लोकांनी एकत्र येत या समाजात पुन्हा नैतिकता रुजविण्यासाठी कष्ट घेणे. यातील पहिला उपाय आता शक्य नाही तेव्हा दुसऱ्या उपायाचा विचार करून आजपासूनच कामाला लागूयात.

(लेखक ‘मजबूती का नाम महात्मा गांधी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.)

- चंद्रकांत झटाले, अकोला 
7769886666

( ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’, जानेवारी २०२५ मधून साभार )

No comments:

Post a Comment