अग्रलेख - १
वामन परत यावा.. ‘माय मरो अन् मावशी जगो’ असे मानणाऱ्या या अभिजनांकडून मराठीचे होणारे नुकसान हे अपरिमित आहे. Written by लोकसत्ता टीम
https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/loksatta-editorial-marathi-sahitya-sammelan-president-dr-jayant-narlikar-speech-zws-70-2707321/
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने जयंत नारळीकर यांच्या भाषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यापूर्वी एक खुलासा. जयंत नारळीकर यांच्या विशुद्ध विज्ञानवादाचा, त्यांच्या सात्त्विक नैतिक मूल्यांचा आणि त्या मूल्यांस प्रत्यक्ष जीवनात सहजपणे उतरवण्याच्या कौशल्याचा एक निस्सीम चाहता असूनही साहित्य संमेलनाचे आयोजक या नात्याने कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतांशी असहमत होणे अवघड. मराठी साहित्य संमेलनात कधी नव्हे इतक्या उच्च दर्जाचा विज्ञानाचा पाईक सहभागी होत असताना वैज्ञानिक तो ‘दिसतो कसा आननी’ हे जाणण्याची उत्सुकता दूरवरच्या मराठी रसिकांस असणे साहजिक. परत जयंतराव अन्य संमेलनाध्यक्षांप्रमाणे गावगन्ना भाषणे झोडणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांचे सार्वजनिक दर्शन (सुदैवाने) तसे दुर्मीळ. त्यामुळे या संमेलनास त्यांनी सदेह उपस्थित राहणे हे ते जी मराठी भाषेची समृद्धता अपेक्षितात त्यासाठी तरी आवश्यक होते. तसे न झाल्याने आयोजकांचा आणि त्याहीपेक्षा लक्षावधी मराठी रसिकांचा जो हिरमोड झाला असेल तो कमी महत्त्वाचा नाही. प्रकृतिअस्वास्थ्य लक्षात घेऊनही त्यांनी या संमेलनाच्या उद्घाटनास तरी हजेरी लावणे हे अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर दुणावणारे ठरले असते. ही बाब नम्रपणे नोंदवल्यानंतर आता त्यांनी मांडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयी.
जयंतरावांचे भाषण आटोपशीर आहे. शंभर-सव्वाशे पानांचे ज्ञानामृत पाजणारे अध्यक्ष मराठी जनांनी पचवलेले असल्याने त्यांचे हे नेमके भाषण पाहता विज्ञानविषयक दृष्टिकोन अंगी बाणलेली व्यक्ती कशी सुलभपणे मुद्दय़ांस हात घालते हे लक्षात येते. सांस्कृतिक जीवनातील आपला अनावर अघळपघळपणा लक्षात घेतल्यास याचे महत्त्व जाणवेल. विज्ञान, त्याआधारे होणारे ललित लेखन, या नव्या शाखेची कसलीही जाण नसणारे प्राध्यापकी कुंठित समीक्षण विश्व, अलीकडे भयावह गतीने प्रसरण पावणारे छद्मविज्ञान आणि त्याहीपेक्षा या निर्बुद्धतेचा स्वीकार करणारे सुशिक्षित अशा अनेक मुद्दय़ांस ते स्पर्श करते. महाराष्ट्र संस्कृतीस गणिती केरोनाना छत्रे, शंकर आबाजी थत्ते, विमानोड्डाणाचे स्वप्न सत्यात आणू पाहणारे शिवाकर बापूजी तळपदे, लोकमान्य टिळक, खुद्द नारळीकरांचे वडील, त्यांचे मामा, विद्यमान विख्यात गणिती नरेंद्र करमरकर (ही नावे केवळ वानगीदाखल. अशी अनेक आहेत. स्थलाअभावी त्या सर्वाचा उल्लेख अशक्य) अशी समृद्ध परंपरा असली तरी विज्ञानाचे हे मूळ या समाजात रुजले नाही हे खरेच. लोकमान्यांच्या वैदिक गणितापेक्षाही त्यांच्या ‘गीतारहस्या’चीच चर्चा अधिक हे त्याचे उदाहरण. हे असे का झाले असावे याचे उत्तर नारळीकरांच्या भाषणात आढळते. ‘साहित्याचे विषय काहीही असो. ते लिहिणारा परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही,’ असे जयंतराव म्हणतात. पण मराठीचे दुर्दैव हे की अनेक विषयशाखांतील मराठी तज्ज्ञांनी मराठीत लिखाण करणे टाळले. ते त्यांच्या अभिजनत्व मिरवण्याच्या आड येत असावे. अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणारे अमर्त्य सेन आयुष्याच्या या टप्प्यावरही ‘मी मनातल्या मनातली आकडेमोड बंगालीतच करतो,’ असे सांगतात/लिहितात. तरीही त्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीयत्वास काहीही बाधा येत नाही. प्रत्यक्षात मराठीची स्थिती काय? नोबेल वगैरे सोडा. पण आज इंग्रजी वाहिन्यांवर अर्थविश्लेषण करणाऱ्या अनेक नामांकित मराठीजनांस त्यांच्या मातृभाषेतून चार ओळी लिहिता येत नाहीत. ‘माय मरो अन् मावशी जगो’ असे मानणाऱ्या या अभिजनांकडून मराठीचे होणारे नुकसान हे अपरिमित आहे. त्यामुळेच नारळीकर म्हणतात त्याप्रमाणे मराठी असमृद्ध राहते. तथापि जयंतराव मोठे ठरतात ते या सर्वास ते अपवाद आहेत म्हणून.
तेव्हा हे सत्य लक्षात घेतल्यानंतर विज्ञान साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आदींवर त्यांनी या भाषणात मांडलेल्या मुद्दय़ांमागील पोटतिडीक जाणवते. ‘तुम्ही फलज्योतिषास विज्ञान मानत नाही कारण तुमची वृत्ती पूर्वग्रहदूषित आहे,’ असे सुनावणाऱ्यांमुळे नारळीकरांना ‘हसावे की रडावे’ हा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात त्यांची वेदना त्यापेक्षाही अधिक असेल. ‘बुडती हे जन, देखवेना डोळा’ या संत तुकारामांच्या शब्दांतून ती अधिक व्यक्त होईल. ती पाहिल्यावर जयंतराव सद्य:स्थितीत समाजापासून दूर आहेत तेच बरे, असे म्हणावे लागेल. जयंतराव, तुम्ही फलज्योतिष काय घेऊन बसलात.. आजचा मराठी माणूस गणेशास दूध पाजण्यापासून गर्भसंस्कार, कोणा बाबा- बापू- महाराजांचा प्रकट दिन वगैरेपर्यंत जाऊन पोहोचला आहे! तुम्ही म्हणता पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे वगैरेतून त्या लेखकांची कल्पनाशक्ती दिसते ते खरेच. आपल्या पूर्वजांनी खरोखरच पुष्पक विमान हवेत उडवले हे खरे असेल तर ते एकमेवच कसे? आणखी दोन-चार विमाने बनवून अन्य अनेकांनाही हा उड्डाणानुभव द्यावा असे का वाटले नाही, हा साधा तर्काधिष्ठित प्रश्नही आजच्या मराठी माणसास पडत नाही. तेव्हा ‘जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्टय़ा अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब त्या साहित्यात सापडायला हवे’ हे तुमचे निरीक्षण सांप्रती कसे लक्षात घेतले जाणार? हाच निकष तुम्ही ऐतिहासिक कादंबऱ्या आणि त्यातील इतिहास यांसही लावू इच्छिता ही आशावादाची हद्दच ठरावी. इंग्रजी साहित्यात ‘पॉप्युलर हिस्टरी’ असा एक प्रकार आहे. शुद्ध इतिहास हा सामान्य वाचकांस कंटाळवाणा वाटू शकतो. म्हणून विज्ञानात केले जाते त्या कथागुंफणाप्रमाणेच इतिहासही सादर केला जातो. म्हटल्यास हे साहित्य ललित. पण म्हणून त्याने इतिहासापासून फारकत घेतलेली नसते. मराठीत धड इतिहासही नाही आणि कादंबरी तर नाहीच नाही असे ‘साहित्य’(?) प्रसवणारे अनेक लेखकराव केवळ माध्यमांतील पुरवणी संपादक, प्रकाशकविश्व यांस उपकृत करून साहित्यिकांच्या कळपात बेमालूम घुसलेले दिसतात त्यांचे काय करायचे हा प्रश्न जयंतराव, तुम्हास पडत नाही हे तुमच्या आदरणीय अलिप्तपणाचे निदर्शक. तेव्हा लोकप्रिय विज्ञान साहित्यात विज्ञान दुय्यम आणि कल्पनारम्यता अधिक असेल तर ते लिखाण निकृष्ट हा तुमचा विज्ञान साहित्याचा निकष ऐतिहासिक म्हणवून खपवल्या जाणाऱ्या लिखाणासही लावला जावा हे मत कितीही योग्य असले तरी ते प्रत्यक्षात येणे अंमळ अवघडच.
दुसरा मुद्दा जयंतराव, तुम्ही इंग्रजी शब्दांच्या वापराविषयी उपस्थित करता. तो अत्यंत रास्त. आपल्याकडे अनेकांचे मराठीप्रेम हे इंग्रजीविषयीच्या अपंगत्वातून आलेले आहे हे कटू सत्य आधी लक्षात घ्यायला हवे. अशा अपंगत्वाचा स्पर्शही न झालेले आपल्यासारखे काही थोडे मान्यवर चांगल्या, रसाळ मराठीत संवाद साधू शकतात. अन्यांचे मात्र हे अपंगत्व लपवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात मराठी उघडे पडते आणि त्यांना इंग्रजीचे पांघरूण मिळत नाही. अशी भीती नसलेली इंग्रजी भाषा योगा, गुरू असे अनेक अन्यभाषी शब्द आपलेसे करते आणि आपले कथित शुद्ध मराठीवादी आपल्याला इंग्रजीही कसे चांगले येते याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. तेव्हा मराठीत विज्ञान लिखाण करणे सोडाच, पण सुमधुर मराठी गाण्यांवर भाष्य करणाऱ्या अनेकांस गाण्यातील ‘फीलिंग्ज’ आणि त्यातील ‘मेलडी’ कशी हृदयाला ‘टच’ करते हे अशा मराठीत सांगावे लागते, तेव्हा काय बोलणार? म्हणून तुमच्या कथांतील पात्रे खूपदा इंग्रजीचा वापर करतात याबाबत तुम्ही अजिबात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कथेच्या ओघात झालेले देहदर्शन ज्याप्रमाणे अश्लील वाटत नाही, त्याप्रमाणे वातावरणाशी सुसंगत परभाषाप्रयोग हा अजिबात भाषिक अपमान नसतो. मात्र त्यासाठी विचारात आणि मांडणीत पुरेपूर सच्चेपणा हवा. तो तुमच्या ठायी पुरेपूर आहेच. त्याच सच्चेपणाने जगणाऱ्या कुसुमाग्रज नगरीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपणास मिळाले हा योगायोग खूपच हृद्य. खंत ही की वाङ्मयीन मूल्ये ही जीवनमूल्येही असायला हवीत असे मानणारे आणि तसे आचरणात आणणारे आपल्याकडे फार नाहीत. तुम्ही वाचकांस ‘विज्ञानाची भीती’ आहे असे म्हणता. ते तसे नाही. खरे कारण विचारांची भीती हे आहे. म्हणून ललित आणि ललितेतर अशी एक अदृश्य दरी आपल्याकडे निर्माण होते आणि आर्थिक, वैज्ञानिक, जागतिक आदी विषयांवर लिहिणाऱ्यास साहित्य संमेलनादी लोकप्रिय उत्सवांपासून दूर ठेवले जाते. नाशकातील हे संमेलन मात्र यास अपवाद. जयंतरावांच्या पुस्तकात ‘वामन परत न आला’. पण साहित्य संमेलनाबाबत मात्र असा ‘वामन’ परत यायला हवा.
अग्रलेख - २
अग्रलेख: वामन परतोनि गेला… विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना डॉ. जयंतराव नारळीकर यांच्यासारख्या विज्ञानव्रतीचे जाणे अधिक क्लेशकारक… Written by लोकसत्ता टीम
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-jayant-narlikar-passed-away-who-contribution-in-the-field-of-science-and-research-amy-95-5101576/
मराठी सारस्वताच्या अंगणात जयंत नारळीकर यांचे आगमन झाले तेव्हा आपले साहित्य विश्व हे गद्या-पद्या, कथा-लघुकथा, समीक्षा- रूपवादी समीक्षा इत्यादींत रममाण होते. आपल्या साहित्यविश्वापासून विज्ञान तसे दूर. विज्ञान, अर्थादी विषयांस ललित क्षेत्राने गावकुसाबाहेर रोखलेले. वास्तविक केरूनाना छत्रे यांच्यापासून ‘इंडियाज एडिसन’ असे गौरवले गेलेले शंकर आबाजी थत्ते ते विमानउड्डाणाचे स्वप्न पाहणारे तळपदे इत्यादी अनेक मराठीच. परंतु मराठी जनांच्या रक्तात विज्ञानवृत्तीचा अभाव असावा. अन्यथा ‘वैदिक गणित’ या संकल्पनेस हात घालणारे, रामायण-महाभारताचा काळ शोधू पाहणारे बळवंतराव ‘गीतारहस्या’साठीच अधिक ओळखले जाते ना. या अशा विज्ञानांधारी वातावरणात जयंत नारळीकर यांचे येणे हा प्रकाशमान सूर्योदय होता. घरातून मिळालेल्या विज्ञान वारशाचा ध्वज जयंतरावांनी केवळ फडकतच ठेवला असे नाही; तर स्वकष्टाने अधिक उंचीवर नेला. पाश्चात्त्य विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी विष्णु नारळीकर आणि त्याचे सुपुत्र जयंत अशा दोघांस टाटा समूहाची शिष्यवृत्ती आपापल्या पिढीत मिळाली. या अशा परंपरेचे हे आगळे उदाहरण. विष्णु नारळीकरांपेक्षा जयंतराव एक पाऊल पुढे गेले आणि साहित्यकृतीतून जनसामान्यांस अधिक जवळचे झाले. ते लिहिते झाले तेव्हा मराठीत विज्ञानकथा हा प्रकार नवीन होता. त्यात जयंतराव सच्चे वैज्ञानिक. आपल्याकडे भाभा अणुकेंद्रांतील कारकुनाचा परिचयही वैज्ञानिक असा करून दिला जात असताना खराखुऱ्या वैज्ञानिक जयंतरावांचे असणे तसे अप्रूपच. ते आता संपले.
‘कृष्णविवर’ ही पहिली कथा जयंतरावांनी १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञान कथा स्पर्धे’साठी पाठवली, त्याअर्थी तोवर मराठीत विज्ञानकथा लिहू पाहणारे अनेक जण होते. पण या विज्ञानकथांचा बाज परग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण किंवा तत्सम प्रकारचा असे. ‘कृष्णविवर’ ही कथा जयंतरावांनी आपल्या नावाचा दबाव कुणावर येऊ नये म्हणून टोपण नावाने- आणि आपले अक्षरही कळू नये म्हणून सहचरी मंगला नारळीकर यांच्या हस्ताक्षरात- पाठवली, तरीही तीच अव्वल ठरणे साहजिक होते. पण एखाद्या बक्षिसापेक्षा अव्वल काम त्या कथेने केले. वैज्ञानिक सिद्धान्तांशी निष्ठा राखणाऱ्या आणि अशा सिद्धान्तांचा प्रचार करण्यासाठी कल्पनेचा आधार घेणाऱ्या नव्या मराठी विज्ञानकथेची सुरुवात ‘कृष्णविवर’मुळे झाली. वास्तविक कृष्णविवरांचा बोलबाला विज्ञानातही नव्हता तेव्हा १९६४ साली मांडला गेलेल्या ‘हॉएल- नारळीकर सिद्धान्ता’ने ‘आकुंचन पावलेल्या ताऱ्यात वा तारकापुंजात दीर्घकाळात गुरुत्वीय बल कमीजास्त होऊ शकते’ असेही निरीक्षण नोंदवले होते. पण गुरुत्वाकर्षण अत्यधिक असलेल्या कृष्णविवरातला ‘काळ’ कसा असेल, त्याच्याशी पृथ्वीवरचा काळ आणि कालगणना यांचे प्रमाण कसे असेल, याचे संशोधन डॉ. नारळीकर आणि त्यांचे मार्गदर्शक फ्रेड हॉएल यांच्या त्या वेळच्या विषयाबाहेरचे होते. कृष्णविवरात काळ गोठतो- म्हणजे त्याची गती कमी होते- म्हणजेच त्यात माणूस शिरल्यास त्याचे वयही गोठते- ही कल्पना जयंतरावांची, त्यातून ‘कृष्णविवर’ लिहिली गेली. पण जयंतरावांच्या एकंदर विज्ञानकथा लेखनातली ‘कल्पना’ म्हणजे काय?
मराठीतल्या भावगीतांनी रुळवलेल्या कल्पनांसारखी ही विज्ञानकथांतली कल्पना स्वैर नव्हती. सोप्या मराठीत विज्ञानाबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न जयंतराव एरवीही करतच असत, मग ‘कल्पना’ आणि कथा कशासाठी? याचे उत्तर जयंतरावांच्या सोप्या मराठीतूनच मिळते. ‘अभ्युपगम’ अर्थात इंग्रजीतल्या ‘हायपोथिसिस’ या शब्दाऐवजी ‘विज्ञानात अशी एक कल्पना आहे’ असे ते म्हणत. इथे कल्पना म्हणजे, प्रयोग आणि निरीक्षणांतून सिद्ध न झालेला वैज्ञानिक विचार. उपलब्ध आणि प्रयोगसिद्ध वैज्ञानिक सिद्धान्तांच्याही पुढे जाऊ पाहणारे कुतूहल. उदाहरणार्थ ‘मोबियस स्ट्रिप’ ही उलट्याचे सुलटे किंवा सुलट्याचे उलटे करणारी पट्टी निश्चितपणे एक गणिती सिद्धान्त मांडते. पण ही पट्टी किंवा तिच्यामागचा सिद्धान्त जर गणितातून प्रत्यक्षात आला आणि माणसे किंवा वस्तू त्यात जाऊन उलट/सुलट होऊ लागल्या तर उजव्या हाताने लिहिणारा माणूस डावखुरा होईल का? डाव्या सोंडेचा गणपती उजव्या सोंडेचा होईल का? या प्रश्नांमागे जो ‘तर काय होईल’ हा विचार आहे, ती कल्पना. या कल्पनेतून ‘उजव्या सोंडेचा गणपती’सारखी कथा लिहिली गेली. त्यानिमित्ताने मराठीत मोबियस पट्टीची चर्चा झाली. अशा कैक वैज्ञानिक सिद्धान्तांना कल्पनेची जोड देऊन नारळीकरांच्या विज्ञानकथांनी मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी वाचकांचेही कुतूहल शमवले आणि जागवले.
आपल्याकडे ललित साहित्य हे निर्हेतुक असावे, अशा आग्रहाचा सुकाळ. त्यामुळे विज्ञानप्रसाराच्या हेतूसाठी कथा, कादंबरिका लिहिणाऱ्या जयंतरावांना अनेकांनी अव्वल मानले नाही. वास्तविक सहेतुक साहित्य ही प्रत्येक समाजाची गरज असतेच आणि त्यासाठी हेतू उदात्त असावा लागतो. प्रचार हाच हेतू असून चालत नाही. हे तारतम्य सुटण्याइतपत कलावादाचा पगडा आपल्याकडे होता त्यामुळे सुरुवातीला जयंतरावांच्या प्रयत्नांतली उदात्तता कुणाला उमजलीच नाही. तशी उमज वाढण्यासाठी दुर्गाबाई भागवतांनी कराड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नारळीकरांच्या कथांचे केलेले कौतुकही फारसे कामी आल्याचे दिसले नाही. पुन्हा मराठीत काही चांगले लिहिले जाते आहे त्याअर्थी ते परभृतच- पक्षी इंग्रजीतून चोरलेलेच- असणार, असा आपल्याकडच्या समीक्षकांचा खाक्या. त्या खाक्यातले दंडुके नारळीकरांवरही फिरले. केवळ ‘एक ऑक्टोबर’ ही तारीख इंग्रजी कथेतली, म्हणून अख्खी कथाच ‘बेतलेली’ आहे असा शेरा एका समीक्षकाने ठोकून दिला. सर आर्थर कॉनन डॉयल यांची गाजलेली पात्रे- शेरलॉक होम्स आणि वॉटसन- स्वत:च्या कथेत आणताना नारळीकरांनी विनयशीलपणे म्हणा किंवा गंमत म्हणून, अख्ख्या कथेत मराठीचा बाज भाषांतरासारखा ठेवला- तोही, त्या काळात भा. रा. भागवत यांनी केलेली शेरलॉक होम्स-मालेची भाषांतरे आठवतील, असा! या लेखकीय क्लृप्तीला दाद देण्याऐवजी ‘ही कथा मूळच्या इंग्रजी अमुकतमुक कथेचे भाषांतर आहे’ असे विधान करून कुणा समीक्षकाने स्वत:च्याच अकलेचे दिवाळे दाखवले.
हे दिवाळे कुणा एकाचे असू शकत नाही. ते सार्वत्रिक आणि अनेकरूपी असते आणि आहे. जे उत्तम ते सारे परकीयच असणार, इतिहासात आपणच तर प्रगत होतो, परकीय राज्यकर्ते आले आणि आपला शक्तिपात झाला… या धारणांमधला परस्परविरोधही अनेकांच्या लक्षात येणार नाही, इतके हे दिवाळे लांबरुंद. याउलट, विज्ञानाच्या प्रांतात प्रत्येक धारणेला, प्रत्येक पायरीवर तपासून पाहिले जाणारच- आपल्या देशाची धरती ‘सोना उगले’ म्हणून धारणांना मोकळे रान द्यायचे, हे विज्ञानात चालत नाही. पण आपल्या अनेक धारणा या आपल्या अस्मितेलाही खतपाणी घालत असताना त्यांवर प्रहार करून काही परिणाम होत नाही. हेही जयंतरावांना नेमके माहीत होते. त्यामुळे त्यांच्या कथा केवळ वैज्ञानिक सिद्धान्तांचा प्रसार करून थांबल्या नाहीत. अस्मिता, संस्कृती यांच्या अवैज्ञानिक अंगाचे दर्शनही त्यांनी ‘पुत्रवती भव’, ‘धूमकेतू’ यांसारख्या अनेक कथांतून घडवले. पण हेही पुरेसे नाही, याची जाणीव जयंतरावांना असावी. त्यामुळेच, ‘धूमकेतू’चा मार्ग महत्प्रयासाने बदलणाऱ्या जागतिक वैज्ञानिकांच्या यशस्वी पथकातल्या भारतीय संशोधकाची पत्नी ‘मी घरात यज्ञयाग केल्यामुळेच हे झाले’ असे म्हणून पतीचे तोंड रसगुल्ला देऊन बंद करते!
विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना जयंतरावांचे जाणे अधिक क्लेशकारक. विज्ञानवृत्ती, तर्कवाद आदी बौद्धिकतेस सामूहिक तिलांजली दिली जात असताना आणि या विज्ञान-श्राद्धविधीस राजमान्यता मिळत असताना जयंत नारळीकर यांचे जाणे खिन्नता निर्माण करते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून जयंतरावांनी दिलेल्या भाषणाचे वर्णन ‘लोकसत्ता’ संपादकीयाने (६ डिसेंबर २०२१) ‘वामन परत यावा’ असे केले होते. आज हा विज्ञान ‘वामन परतोनि गेला’ असे म्हणावे लागेल. या विज्ञानव्रतीस ‘लोकसत्ता’ परिवाराची विनम्र आदरांजली.
No comments:
Post a Comment