Saturday, 15 March 2025

मोदी सरकारचे फसलेले परराष्ट्र धोरण

 मोदी सरकारचे  फसलेले परराष्ट्र धोरण  

आश्चर्य वाटले ? ५६ इंची नेत्याचे परराष्ट्र धोरण फसले ? कसे काय बुवा ?

चला आपण जरा थोडेसे मागे जाऊन सत्य परिस्थिती पाहुयात काय होती ते

२०१३ साली निवडणुका होऊन झालेल्या सत्ता बदलात भाजप प्रणित मोदी सरकार सत्तेत आले. त्या आधी भारताचे शेजारी देशांपैकी मित्र आणि शत्रृ कोणते होते ते बघुयात.

मित्र देश - ८

१. नेपाळ

२. भूतान

३. बांग्लादेश

४. थायलंड

५. म्यानमार

६. मालदीव

७. श्रीलंका

८. अफगाणिस्थान (या देशाची सीमा आपल्या देशाला लागून नसली तरीही पाकिस्तान पलीकडचा देश म्हणून सामरिक दृष्ट्या महत्वाचा आहे.)

शत्रू राष्ट्र - २

१. पाकिस्तान

२. चीन

तटस्थ देश = ०

आज २०२५ मध्ये मोदींचा आलेख काय सांगतो ?

मित्र देश : ०

तटस्थ झालेले देश : २

१. भूतान - चीन ने इथे बरेच पाय रोवले आहेत. आणि भारत भूतान चे रक्षण करू शकेल असा विश्वास भारताने जवळपास गमावला आहे. उलटपक्षी चीन ने भूतानला त्यांचे स्वतःचे अस्तित्त्व टिकवले जाईल याचा विश्वास देण्यात ते यशस्वी झाले आहेत. भूतान चे नेटवर्क बरेचसे चिनी कंपन्या बघतात.

२. थायलंड - भारतासोबत व्यापारी संबंध अजूनही टिकून आहेत. पण मैत्रीपूर्ण संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. चीन चा खूप मोठा प्रभाव असलेला देश झाला आहे थायलंड.

शत्रू नसलेली पण संबंधात तेढ निर्माण झालेली राष्ट्रे :

१. अफगाणिस्थान - तालिबान पूर्ण ताबा मिळवेपर्यंत भारताने बघ्याची भूमिका घेतली. कट्टरपंथी तालिबानी आल्याने भारताशी त्यांच्या निष्ठा नाहीयेत हे उघड आहे. अफगाणी लोक तालिबान पासून आम्हाला वाचवा अशी मदत मागत होते पण मोदींनी तालिबानी अतिरेक्यांनी काबूल विमानतळ ताब्यात घेईपर्यंत भारतीयांना देखील अफगाणिस्थानातून काढले नव्हते. नंतर मग लष्करी विमाने पाठवून आणि तालिबान्यांना विनंती करून भारतीयांना आणावे लागले.

पण अफगाणी लोकांचा भारतावर असलेला विश्वास मोदींनी गमावला.

२. नेपाळ - चीन ने इथे खूप मोठा हात मारला आहे. नेपाळला आता भारताची गरज उरली नाही. पूर्णपणे चीन च्या मदतीवर अवलंबून असलेला देश झालेला आहे. नेपाळ आता पूर्णपणे भारताशिवाय स्वतःचे अस्तित्व टिकवू शकतो

३. बांग्लादेश - शेख हसीनाचे सरकार कट्टरपंथी उलथवणार आहेत ही माहिती आपल्या इंटेलिजन्स कडे नक्कीच असणार होती. पण सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आणि बांग्लादेशच्या रूपाने थेट कट्टरपंथी शत्रू भारताने निर्माण करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. आता तेथील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे फुटेज भारतात हिंदू मुस्लिम तेढ अजून पसरवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक काम करत आहेत. मुळात हे थांबवता आले असते. ते मोदींनी केले नाही.

४. म्यानमार - रोहिंग्या बद्दलची भारताची भूमीका आणि मणिपूर मध्ये म्यानमार मधील कुकी लोकांवर फोडलेले खापर यामुळे म्यानमार भारतापासून एकदम अलिप्त झाला आहे. शिवाय काही मिलिटरी ऑपरेशन्स भारताने म्यानमार लष्कराला माहिती न देता त्यांच्या जमिनीवर केले यामुळेही म्यानमार नाराज आहे.

५. श्रीलंका - पूर्णपणे चिनी बाजूला झुकलेला देश चीनला लष्करी तळ बांधू देण्यासाठी श्रीलंकेने परवानगी दिली आहे.

६. मालदिव - पूर्णपणे चिनी बाजूला झुकलेला देश. मोदींनी अलीकडेच मालदीव विरोधात केलेला व्यक्तिगत प्रचार त्यांच्या अपरिपक्वतेची आणि अहंकारी प्रवृत्तीचे दर्शन घडवणारा ठरला. त्यात सोशल मीडियावर मालदीव पर्यटन करण्यावर बंदी टाका असे विकृत काही कट्टरपंथी लोकांनी प्रचार केला. त्यामुळे मालदीव मध्ये पर्यटन बुकिंग कॅन्सल झाले असले तरीही चीन ने हा खर्च भरून दिला आणि आता मालदीव ला देखील भारताची काहीच गरज उरली नाही. यापुढे भारताचा तळ मालदीव मधून पुढील ६ महिन्यात कायमचा बंद होणार आणि चीन तिथे नवीन तळ उभारणार आहे.

शत्रू राष्ट्र - २

१. पाकिस्तान

२. चीन

इथे सर्वात चिंतेचे कारण हे आहे कि भारताचे परराष्ट्र धोरण एवढे फसले आहे कि शेजारी राष्ट्र आपण शत्रुत्वाच्या उंबरठयावर आणून ठेवले आहेत.

मोदी सरकारचे हे मोठे अपयश झाकण्यासाठी हे असले लेख लिहवून समाजात खोटे बागलबुवा निर्माण करण्यासाठी केले जातीलच.

पण सत्य हे आहे कि मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत बसले आणि आतापर्यंत असलेले मैत्रीचे संबंध सोडून देऊन चीन ला हवे तितके पाय पसरू दिले आहेत. या सर्व देशांना चीन बदल माहिती नाही असे नाही. पण त्यांनी भारतासोबत राहण्याची भूमिका याचसाठी घेतली होती कि चिनी वर्चस्व त्यांच्या स्वातंत्र्याला नख लावू शकते हे त्यांना माहिती होते. अगदी भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही भारताची हीच भूमिका त्यांनी टिकवली होती. पुढे मनमोहन सिंग यांच्या सरकारने देखील १० वर्षे हीच परराष्ट्रनीती टिकवली आणि सर्व शेजारी राष्ट्रे भारतासोबत राहिली.

गेल्या ११ वर्षांत मोदींनी स्वतःच्या अहंकारी वृत्तीपायी परराष्ट्रकारणाचा पूर्ण फज्जा उडवला आहे. आणि मित्र असलेले देश आता तटस्थ होऊन शत्रू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

हे आहे वास्तव.

उत्तर आणि उत्तर पश्चिमेकडे एकच शत्रू द्वार आधी पासूनच होते. मोदी सरकारने शत्रू साठी भारताचे आणखी ३ दारे उत्तर पूर्वेकडे बांग्लादेश च्या रूपाने , दक्षिणेकडे श्रीलंकेच्या रूपाने, आणि अरबी समुद्रात मालदीव च्या रूपाने उघडे केले आहे.

हे वास्तव आहे. ज्यांना हे स्पष्ट दिसत नसेल त्यांनी भगवे चष्मे घालून खुशाल हिंदू मुस्लिम करत बसावे.

लवकरच चीन नॉर्थ ईस्ट चा ताबा मिळवून भारताचा एक मोठा भूभाग बळकावणार आहे. त्यावेळी मोदींची स्तुतीसुमने गाण्यासाठी बरे झाले चिनी वंशाचे लोक आपल्यातून गेले अशा आशयाचे लेख आणि मीडियातून भडीमार बघायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आपण सर्व भारतीय एकच आहोत हे मोदी सरकारच्या लक्षात येईल तो सुदिन.

वरील सर्व घटनाक्रम बघून शाळेतला विद्यार्थी सुद्धा सांगेल कि चीन भारताशी एका मोठ्या युद्धाची स्पष्ट तयारी करतो आहे. नॉर्थ ईस्ट भाग पूर्ण बळकावला जाणार हे स्पष्ट दिसते आहे. मोदी याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि शेजारी राष्ट्रे चीन कडे गेली तर जाऊ देत असा दृष्टिकोन भारताच्या अंगणात युद्ध आणतो आहे.

मोदी भक्त किंवा हिंदुत्ववादी कट्टरपंथी लोकांना यात मोदींची चूक वाटत नसेल तर ते चीन, पाकिस्तान , हिंदू मुस्लिम , रोहिंग्या , चिनी दिसणारे लोक अशी कारणे देऊन मोदींना विष्णूचा १० वा कल्की अवतार घोषित करूच शकतात. पण त्याने सत्य बदलणार नाही. एवढे लक्षात आले तरी पुरे.

पुढील पिढ्या भाजप आणि मोदींच्या या मूर्खपणाची किंमत मोजणार आहेत. तेव्हा सीटबेल्ट बांधा आणि शो बघत राहा.